औरंगाबाद, दि. 28 : औरंगाबाद महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या वॉर्ड पुनर्रचनेतील गोंधळ संपण्याचे नाव घेत नाही, असे स्पष्ट झाले आहे. जाहीर झालेल्या पुनर्रचनेला आलेल्या आक्षेपानंतर फार मोठ्या प्रमाणावर बदल होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र तसे काहीही घडण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे या संदर्भातील अनिश्चितता कायम आहे. वॉर्ड पुनर्रचनेला साडेतीनशे आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश आक्षेप मान्य करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात पुनर्रचनेत कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे मनपाची अनागोंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
मनपा निवडणुकीकरिता प्रशासनाने केलेल्या वॉर्ड रचनेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचे दिसून आले. याचा आणखी एक प्रकार समोर येत आहे. कैसर कॉलनी वॉर्ड संबंधी दाखल आक्षेप आयोगाने मान्य केला. परंतु अंतिम आराखडा करताना प्रशासनाला या दुरुस्तीचा विसर पडला.यामुळे हा प्रगणक (भाग) अद्यापही नवाबपुरा वॉर्डांतच असल्याचे दिसते. यामुळे पुन्हा एकदा वॉर्ड रचनेतील गोंधळ समोर आला आहे.
मनपा वॉर्ड रचनेचा प्रारूप आराखड्यात वार्ड क्रमांक 49 नवाबपुरा या वॉर्डात पूर्वी कैसर कॉलनीत समाविष्ट असलेला सुमारे 1 हजार लोकसंख्येचा प्रगणक(ईबी,भाग) जोडण्यात आला. यावर माजी नगरसेवक शहानवाज खान यांनी आक्षेप दाखल केला. प्रकरणी निवडणूक आयोगाने नुकतीच आक्षेप सुनावणी घेतली. यात खान यांचा आक्षेप मान्य करण्यात आला. यामुळे हा प्रगणक पुन्हा वॉर्ड क्रमांक 48 कैसर कॉलनीत समाविष्ट करण्याचे सांगण्यात आले. या नंतर प्रशासनाने अंतिम आराखडा सादर केला. यात नकाशाप्रमाणे संबंधित वॉर्डच्या सीमा नसल्याचे नवाबपुराचे नगरसेवक फिरोज खान यांच्या निदर्शनाला आले. आयोगाने वगळण्यास सांगितलेला तो प्रगणक अद्याप आपल्याच वार्डात असल्याचे नकाशात दिसत आहे. असे त्यांनी निवडणूक विभागाच्या अधिकार्यांना सांगितले. साहेब संबंधित नागरिकांना आपण कुठल्या वॉर्डांत आहोत असा प्रश्न पडला असल्याचे ते म्हणाले. या प्रकारावरून काही काळ अधिकारीदेखील गोंधळात पडले. त्यांनी फिरोज यांची कशी बशी समजूत काढत वेळ मारून नेली. सध्यातरी ही एक चूक प्रशासनाच्या निदर्शनाला आली. असे आणखी काही प्रकरणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे वॉर्ड रचनेतील गोंधळ अद्यापही कायम असल्याचे दिसून येते.
मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू
दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मनपा निवडणुकीकरिता मतदार याद्या तयार करण्याचे काम आज शुक्रवारपासून सुरू करण्यात आले. एकूण साडेतीनशे अधिकारी-कर्मचारी हे काम करणार असून, 9 मार्च रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. अशी माहिती उपायुक्त सुमंत मोरे यांनी दिली.
एप्रिल महिन्यात मनपाची निवडणूक पार पडणार आहे. याकरिता प्रशासनाने 115 वॉर्डांची रचना तयार करून आरक्षण सोडतही घेतली. नुकतीच अंतिम वार्ड रचना प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर आता आज शुक्रवारपासून या निवडणुकीकरिता मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यासंबंधी आज सायंकाळी प्रशासनाची बैठक पार पडणार आहे. दहा मुख्य अधिकार्यांच्या देखरेखीखाली हे काम केले जाणार आहे. त्यांना सहायक म्हणून प्रत्येकी चार अधिकारी देखील देण्यात आले . असे एकूण 358 अधिकारी-कर्मचार्यांच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. 9 मार्च रोजी प्रारुप मतदार याद्या प्रकाशित केल्या जातील. यानंतर यावर अक्षेप हरकती स्वीकारल्या जाईल. पुढे 16 मार्च पर्यंत अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.